A response to Raj Thackeray’s Gudi Padva Speech

उथळ पाण्याला खळखळाट फार: राज ठाकरे यांचे भाषण

गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीने जोरदार भाषण ठोकले. ते उत्तम वक्ते आहेत. पण आडात नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार? मुळातच काही ठोस मुद्दे नसल्याने तारेवरची कसरत करत आपल्या नव्या सोयीरीकीला खुश करण्यासाठी केलेली आवाजबाजी एवढेच त्याचे वर्णन करता येईल.

आता ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचे विश्लेषण करूया म्हणजे त्यांच्या भाषणातील फोलपणा समजून येईल.

मुद्दा १: गूगलवर मोदी यांची ओळख फेकू अशी आहे.: 

हे खरे असेलही पण गूगलशोध घेण्यासाठी जी पद्धती वापरते (अल्गोरिथम)[1] त्याचा हा परिणाम आहे. फेकू किंवा आतंकवादी असे कोणाच्याही नावापुढे जोडून वारंवार अशी माहिती नेटवर टाकल्यास हे सहज शक्य आहे. मोदी जगातले प्रभावशाली नेते आहेत आणि शत्रुदेश तसेच भारतातील विरोधी पक्ष त्यांच्या नवे खडे फोडण्यासाठी सदैव तयार असणारच. मागेही मोदी यांचे नाव आतंकवाद्यांच्या यादीत गूगलने टाकले पण त्यानंतर आमची अलोगॉरिथम सुधारण्याची गरज आहे असे सांगून गूगलने जाहीर दिलगिरी व्यक्त केली[2].

मुद्दा २: पाकिस्तान चे F16 विमान पाडल्याची खोटी माहिती मोदींनी दिली.

F16 पाडल्याचा अमेरिकन प्रसार माध्यमांनी इन्कार केलेला आहे तर भारतीय वायूसेनेने त्याचे सज्जड रडार चे पुरावे दिले आहेत. यातील राजकारण मजेशीर आहे. F16 हे आधुनिक तर मिग २१ हे खूप जुने तंत्रज्ञान आहे. त्यामुळे F16 पाडले गेले असे कबूल करण्यात अमेरिकेची नाच्चक्की आहे. त्यामुळे त्यांच्या F16 विक्रीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच पाकिस्तानने तसे कबूल केल्यास त्यांना ज्या करारा द्वारे F16 मिळाली त्याचे उल्लंघन होईल. त्यामुळे दोन्ही बाजू कडून ‘अगा हे घडलेची नाही’ असे म्हणणे सोईस्कर आहे. प्रश्न आहे तो हा कि विरोधी पक्ष मोदी द्वेषाने इतके पछाडले आहेत कि भारतीय सेनेचा पराक्रमही त्यांना मान्य नाही.

मुद्दा ३: मोदींनी वार्ताहर परिषद घेतली नाही.

अश्या परिषदेचा उद्देश प्रश्न विचारून माहिती जाणून घेण्याचा असेल तर परिषद घ्यायला हवी. परंतु विरोधीपक्षांचे दलाल म्हणून काम करणारे पत्रकार केवळ निंदानालस्तीसाठी ह्या व्यासपीठाचा गैर वापर करतात हे सर्वश्रुत आहे. अलीकडेच ABP News ने मोदींची मुलाखत घेतली. त्यात मोदींनी प्रसार माध्यमे कशी आपपर भाव करतात हे उदाहरणाने सांगून त्यांचे पितळ उघडे पाडले. ABP News ने मुलाखतीचा तो भागच गाळून टाकला. त्यामुळे पत्रकार परिषदा घेऊन वेळ दवडण्यापेक्षा जनतेशी सरळ संपर्क साधण्यास मोदींनी मन कि बात  द्वारे   सुरुवात केली. मोदी नि भारतीय आणि परदेशी माध्यमांना (उदा. फरीद झकारिया) अनेक मुलाखती दिल्या आहेत.

मुद्दा ४: मोदींनी १५ लाख दिले नाहीत.

सर्वप्रथम म्हणजे कोणाच्या वैयक्तीकखात्यात सरकार (एखाद्या योजनेखाली अनुदान असल्याशिवाय) अशी  राशी जमा करू शकत नाही. मोदींनी असे कोणतेही आश्वासन दिल्याचा पुरावा नाही पण दडपून खोटे बोलणे हेच एकमेव राजकीय हत्यार सध्या विरोधकांकडे आहे असे दिसते. छत्तीसगढ येथील सभेत मोदी म्हणाले होते कि परदेशातील काळा पैसा एवढा आहे कि तो परत आणल्यास प्रत्येक गरिबापोटी रुपये १५ लाख एवढी रक्कम असेल[3]. ते काळ्या पैशाबद्दल बोलत होते पण जणू काही ते प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जमाकरणार आहेत अशी खोटी अफवा पसरविली गेली. राजकीय फायद्यासाठी खोट्या बातम्या पेरणे हे विरोधी पक्ष करतातच त्यामुळे सत्यकाय आहे हे पडताळणे महत्वाचे. भाजपच्या कोणत्याही जाहीरनाम्यात रु १५ लाखाचा उल्लेख नाही

 

मुद्दा ५: मोदींना एवढे प्रचंड बहुमत मिळाले कि त्यांना चमत्कार करून दाखवणे शक्य होते.

ज्या काँग्रेसबरोबर ठाकरे यांनी सोयरीक केली आहे त्यांना अनेक वर्षे प्रचंड बहुमत होते मग का चमत्कार घडू शकला नाही?  का भारताचा उल्लेख जगभर एक गरीब देश म्हणून गेली ७० वर्षे होत राहिला? शिवाय नाशिक पालिकेत सत्तेत असताना मनसेने जो चमत्कार घडविला त्यामुळे त्यांना जनतेने घरी बसवले. गरिबांसाठी नऊ कोटी स्वच्छता गृहे, सहा कोटी गॅस कनेक्शन, १.५ कोटी घरे केवळ ५ वर्षात याला चमत्कार नाही तर काय म्हणायचे? सुमारे ७० वर्षे सत्तेत राहून देखील १८००० गावात वीज पोचली नाही. मोदींनी पोचविली हा चमत्कार नाहीतर काय? हि गावे अतिशय दुर्गमभागात होती तरी देखील दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हे शक्य झाले. पण फुकट सल्ला द्यायला काय जाते? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला.

मुद्दा ६: काँग्रेस च्या योजनांची केवळ नावे बदलली. 

इतका हास्यास्पद आरोप केवळ ठाकरे किंवा काँग्रेस करू शकते. काँग्रेसची गरिबी हटाव योजना नेहरूंच्या काळापासून चालू आहे तिचीच घोषणा राहुल गांधी निर्लज्जपणे करतात तेव्हा यांच्या योजनांनी काय साधले असा प्रश्न निर्माण होतो. देशासमोरचे जे प्रश्न आहेत त्यानुरूप योजना बनणार ना. मग मोदी साठी काँग्रेस ने  प्रश्न मुळातच का ठेवले. योजना आणून ती नीट कार्यान्वयन केली असती तर मोदींचे कष्ट वाचले असते आणि त्यांना इतर समस्यांवर उपाय योजना करण्यास वेळ मिळाला असता.

मुद्दा ७: रोम विमानतळाला लिओनार्डो दि विंची नाव दिले आहे है ऐकून ठाकरेंचा ऊर भरून आला.  असेच एखाद्या कलाकाराच्या  नावाने विमानतळ का नाही याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. 

मुळात लिओनार्डो हे जगविख्यात शिल्पकार, चित्रकार, संशोधक असे बहुढंगी व्यक्तिमत्व होते. आपणही व्यंगचित्रकार आहोत त्यामुळे आपल्या नावाने विमानतळ का नसावा अशी ठाकरे यांची खंत असावी. ते विसरले कि महाराष्ट्र शिवाजी महाराजांचे नावे ओळखला जातो आणि मुंबई विमानतळाला महाराजांचे नाव शिवसेना भाजप युतीच्या काळात १९९९ मध्ये दिले गेले. खरेतर ठाकरे यांना टीकाच करायची होती तर त्यांनी काँग्रेस सरकारला जाब विचारायला हवा होता कि ततपूर्वी अनेक वर्षे सत्तेत असून हे काम का झाले नाही? पोर्ट ट्रस्ट ला नेहरूंचे नाव का दिले गेले? कान्होजी आंग्रे जे महाराज्यांच्या नाविक दलाचे प्रमुख होते त्यांचे नाव का दिले गेलेनाही? श्रीनगर विमानतळाला शेख उल आलम ह्या संतांचे नाव दिले गेले आहे. मग महाराष्ट्रात तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर यांच्या नावाने विमानतळ का नाही? लोकमान्य टिळक, महात्मा फुले, आंबेडकर यांचे नवे विमानतळ, बंदर का नाही? पाहावे तिकडे गांधी नेहरू यांचाच सुळसुळाट.

मुद्दा ८: आधार कार्डला आधी विरोध पण सत्तेत आल्यावर त्याचाच प्रसार.

आधारकार्ड ची कल्पना (एक प्रकारचे नागरिक ओळख पत्र) वाजपेयींचा काळात पुढे करण्यात आली. त्यामुळे मोदींचा त्याला कधीच विरोध नव्हता. परंतु मनमोहन सरकार ज्या प्रमाणे योजना राबवत होते त्यामुळे बांगलादेशी व इतर घुसखोर त्याचा नागरिकत्वासाठी वापर करू शकले असते. त्यामुळे योजनेची सुरक्षितता धोक्यात होती. मोदीसरकारने २०१४ मध्ये कायदा मंत्रालय, गृहमंत्रालय, तांत्रिक विभाग, नंदन निलकेनी यांच्या समन्वयाने सध्याचे सुरक्षित आधारकार्ड तयारकेले आणि ते सरळ लाभ योजनेशी (DBT) जोडले. अर्थात ठाकरे यांचा उद्देश केवळ टीका करणे हाच असल्याने याची माहिती ते जनतेला का देतील?

मुद्दा ९: नमामि गंगे वर हजारो करोड खर्च झाले पण पुढे काय झाले असा प्रश्न ठाकरे विचारतात.

गंगा अविरल करणे म्हणजे नाशिक मधले गटार दुरुस्त करणे नव्हे. ते कामही ठाकरे यांच्या मनसेला तेथे सत्तेत असताना धड करता आले नव्हते. गंगे पेक्षा अर्ध्या लांबीची ऱ्हाईन नदी[4] साफ करायला तीन दशके आणि ४५ अब्ज डॉलर खर्च आला. गंगा सफाई वर आजतागायत तीन अब्ज डॉलर खर्च झाल्याचा अंदाज आहे (राजीव गांधी काळा पासून). राजीव गांधींच्या काळात पैसा कसा वापरला गेला हा संशोधनाचा विषय आहे.मोदी सरकारने २०१४ मध्ये हे काम नमामि गंगे योजने खाली हातात घेतले. गंगा अविरल होण्यास बराच कालावधी लागणार असला तरी गंगा काही प्रमाणात स्वच्छ झाल्याची कबुली स्वतः प्रियांका गांधी यांनीच गंगा पाण्याचे प्राशन करून दिली. साहजिकच योगी आदित्यनाथ म्हणतात त्या प्रमाणे अजून कोणता पुरावा हवा. मोदी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे हे घाटावरची स्वच्छता पहिली तरी कळून येईल.

मुद्दा ९: नोटबंदी मुळे काळ्या पैश्यात काय फरक पडला. ९९% पैसा बँकामध्ये परत आला.

नोटबंदी मुळे चलनात असलेली रोकड बँकामध्ये परतली व काही थोडी बाद झाली. पण बँकामध्ये पैसा भरून काळा पैसा पांढरा होत नाही. आता सरकारला तुमच्या पर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले आहे. सध्या मोदी सरकार कॉम्पुटर तंत्रज्ञानाचा वापर करून अश्या करचुकव्या पर्यंत पोहोचत आहे. नोटबंदी नंतर केवळ आठ महिन्यातच आयकर विभागाने रुपये ५४०० कोटींचा काळा पैसा जप्त केला[5] व कायदेशीर कार्यवाही चालू केली. कर देणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली[6]. डिजिटल व्यवहारात देखील लक्षणीय बदल झाला.

मुद्दा १०: मोदी आणि हिटलर यांच्यात साम्य आहे हे सांगण्यासाठी काही उदाहरणे ठाकरे यांनी दिली.

वास्तविक मोदी खरोखरच हिटलर असले तर ठाकरेंना यात का वावगे वाटते? राज ठाकरे यांचे विठ्ठल बाळासाहेब यांनी मुलाखतीतच त्यांचे हिटलर प्रेम जगजाहीर केले आहे[7]. हिटलरने जग जिंकायचा संकल्प केला होता.मोदी नि तसं काही केलं नाही. हिटलरने यहुदी द्वेष निर्माण केला तसा मोदींनी कोणत्या समाजा विरुद्ध केला ते ठाकरे सांगत नाहीत. त्यांना मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण केलं असे सांगायचे असेल तर परिस्थिती उलटी आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती ह्या कडव्या मुस्लिम राष्ट्रांनी मोदींचा सर्वोच्य बहुमान अलीकडेच केलं आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच ऑगस्ट वेस्टलँड चा दलाल मिचेल आज भारताच्या तुरुंगात आहे.

मुद्दा ११: गोमांसासाठी ज्याची हत्या झाली त्याच्या कडे मटण सापडले गोमास नाही.

ठाकरे यांचा इशारा अखलाक हत्येकडे आहे. पण अखलाकची हत्या उत्तर प्रदेशात समाजवादी सरकार असताना झाली. तरी देखील मोदींच्या डोक्यावर खापर का फोडत आहेत?? राज्यातील कायदा सुव्यवस्था राज्य सरकार करते हे ठाकरे यांना माहित नसावे कारण साधी नगरपालिका चालवायची संधी हि जनतेने त्यांना क्वचितच दिली आहे.

मुद्दा १२: देश खड्ड्यात घातला. 

ही टीका करताना खड्ड्यात घातला म्हणजे काय ते ठाकरे नक्की सांगत नाहीत. मोदी सत्तेवर येण्याआधी जगातील पांच कमकुवत अर्थव्यवस्थेत भारताचा नंबर होता. आज भारत जगातील सगळ्यात द्रुत गतीने वाढ करणारी अर्थव्यवस्था आहे. भाववाढ रोखण्यात मोदी सरकार यशस्वी झाले आहे. आणि केवळ पाच वर्षात मोदींनी देशाची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर आणली आहे. मोदी सत्ते वर आले तर भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असे अनुमान आहे. परदेश नीती, सरंक्षण नीती, गरिबी हटाव अश्या सर्वच प्रांतात मोदींनी अथक परिश्रमाने मोठी प्रगती केली आहे.

ठाकरे यांना मोदींना झोडण्याचे कंत्राट दिले गेले असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि हास्यास्पद म्हणजे चार वाक्य धड बोलता न येणारे राहुल कसे छान छान आहेत अशी भलावण करणे त्यांना भाग पडत आहे. इतरही किरकोळ मुद्दे मोदींवर तोंडसुख घेण्यासाठी वापरले आहेत. एकमात्र खरे ठाकरे यांच्या सभेला गर्दी तुफान होती. ती बहुदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस ने जमाकेलेली असावी कारण क्वचितच टाळ्या मिळत होत्या. चला ह्या नव्या सोयरिकीच्या निमित्ताने का होईना पण सभेला गर्दी झाली हे पाहून ठाकरे यांना आनंद झाला असेल.

[1] https://www.independent.co.uk/news/world/asia/google-apologises-to-indian-pm-narendra-modi-after-he-appears-in-top-10-list-of-criminals-10297350.html

[2] https://www.independent.co.uk/news/world/asia/google-apologises-to-indian-pm-narendra-modi-after-he-appears-in-top-10-list-of-criminals-10297350.html

[3] https://www.boomlive.in/did-modi-promise-to-deposit-rs-15-lakh-in-every-account-a-factcheck/

[4] https://www.newyorker.com/magazine/2016/07/25/what-it-takes-to-clean-the-ganges

[5] https://www.businesstoday.in/current/economy-politics/what-has-pm-modi-done-to-fight-black-money-an-explainer/story/280890.html

[6] https://www.hindustantimes.com/india-news/demonetisation-effect-more-black-money-unearthed-as-tax-raids-increase/story-MG8dM08jGtVb7bKdYYu3mJ.html

[7] https://www.britannica.com/biography/Bal-Thackeray

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s